प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधणीसाठी निधी द्यावा- माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि भादोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही आरोग्य केंद्रांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येकी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पोवार यांच्याकडे माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्राद्वारे केली.

जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या इमारतीमध्येच रुग्णसेवा सुरू आहे. तसेच इथल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही अवस्था दयनीय आहे.त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत नवी उभारण्याची आवश्यकता आहे.

महामार्गावरील गावे असल्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक आणि औद्योगिक वसाहती मधील कर्मचारीही येथे उपचारांसाठी दाखल होतात. पण इमारती अभावी उपचारांवर मर्यादा येत आहेत.

त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत नवी उभारण्याची आवश्यकता आहे.

या पत्राची तातडीने दखल घेत आरोग्य राज्य मंत्र्यांनी लवकरच निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिरोली आणि भादोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा इमारतीचा प्रश्न निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे.