शिरोलीतील सिम्बॉलिकमध्ये “शिव विचारांचा” जागर

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास दाखवणाऱ्या ऐतिहासिक लघु नाटिका व किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव विचारांचा जागर करण्यात आला. किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहून पालक व प्रेक्षक भारावून गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये किल्ले बांधणी स्पर्धेचे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. गटवार घेतलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या सुरेख, अप्रतिम व हुबेहुब प्रतिकृती साकारल्या होत्या. किल्ले स्पर्धेबरोबरच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवणाऱ्या ऐतिहासिक लघु नाटिका सादर केल्या. शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेक पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक नाट्यामधून पालकांसमोर सादर केला. प्रत्येक कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पालकांनी प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष व गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नायकुडे व अंजली अजयसिंह देसाई यांच्या हस्ते शिवरायांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाले.
किल्ला स्पर्धा व ऐतिहासिक नाटिका मधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पनाशक्तीला चालना मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ स्कूलने उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केल्याचे मत गणेश नायकुडे यांनी व्यक्त केले.

गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारसांची जतन ही काळाची गरज बनली आहे. किल्ले स्पर्धेतून, किल्ल्याचे संरक्षण ही आपली जबाबदारी असल्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्यात यश आल्याचे स्कूलच्या संस्थापिका गीता पाटील यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक मृणाल पाटील, नविता नायकुडे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, बबन संकपाळ आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य प्रशांत कटारकर यांनी केले. आभार उपप्राचार्य तरन्नुम मुल्ला यांनी मानले.