गारगोटी (प्रतिनिधी) : कडगाव परिसरात परिवर्तन आघाडीच्या बाजुने सभासदांची प्रचंड लाट निर्माण झाली असून परिवर्तन आघाडीचा विजयरथ आता कोणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. ते कडगाव येथे बिद्री कारखान्याच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थितीत होते.
पुढे बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, ऊस तोडणी करून पाठविल्या शिवाय सभासदांचा बिद्रीला ऊसच जात नाही. तोडणी कार्यक्रमातही बट्ट्याबोळ असतो. कारखान्यातील नफ्यामध्ये कोट्यावधी रूपयांचा तोटा दाखवून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर दरोडा घालण्याचे महापाप करणा-या के. पी. पाटील यांची आता बसपाळीची वेळ आली आहे असे सांगून शरद पवारांची निष्ठा सांगणा-यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात जाऊन धरला.
दुसऱ्यांबद्दल गद्दारीची भाषा करणारेच महागद्दार समजायचे काय? असा सवाल आमदार आबिटकर यांनी केपींना केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गोरगरीब सभासदांच्यासाठी असलेल्या बिद्री कारखान्याच्या शाळा, कॉलेजच्या प्रगतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वतःचे शैक्षणिक उभा करून आर्थिक तुंबड्या भरण्याचे महापाप करणा-या चेअरमन के. पी. पाटील यांना सभासद कायमचा धडा शिकवतील असा इशारा दिला आहे.
लै भारी कारभा-यांना काय भारी विचारण्याची वेळ आता आली असुन त्यांच्या लै भारी कारभाराचा पर्दाफाश सभासदच करतील असा इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला आहे.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, के. पी पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे सत्तर टक्के सभासदांचा ऊसच बिद्री कारखान्याला नेला जात नाही. हसन-किशन या जोडगोळीने बिद्रीच्या माध्यमातून स्वहित जोपासले आहे. एकाचे शैक्षणिक संकुल चालले पाहिजे यासाठी शाळेकडे दुर्लक्ष केले तर दुसऱ्याचा खासगी कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी शेतक-यांच्या ऊस उचलीकडे पाठ फिरवायची असा यांचा उद्योग सुरू आहे.
स्वहित जोपासण्यासाठी बिद्री कारखान्याचा अदृश्यपणे कोट्यावधी रूपयांचा तोटा करणा-या या जोडगोळीला सभासदच बिद्रीतून हद्दपार करतील.
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील म्हणाले, के. पी. पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून फारकत घेतली आहे. बिद्रीची सत्ता द्या कारखान्याच्यावतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, चालकांना निवारा व सभासदांसाठी विमा पाॅलीशी देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी उमेदवार नाथाजी पाटील, देवराज बारदेस्कर, युवानेते बाबा नांदेकर, आनंदा ढोकरे यांचे भाषण झाले.
स्वागत अजित देसाई यांनी केले. यावेळी दौलतराव जाधव, सर्जेराव देसाई, किर्ती देसाई, भिकाजी पोतदार, मानसिंग पाटील, परिवर्तन आघाडीचे उमेदवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर यांनी मानले.
विश्वास घातकी माणूस….
स्व. आमदार नामदेवराव भोईटे यांचे विमानात तिकीट कापले, २००४ च्या निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांना शब्द देऊन त्यांना फसविले. दाजी ए. वाय. पाटील यांनाही फसविले. आता रणजीतचा नंबर असे आ. आबिटकर यांनी आपल्या भाषणात सागतात उपस्थितांत एकच हशा पिकला.