नवी दिल्ली: भारतातील अनेकजण कामगार म्हणून सौदी अरेबियामध्ये जात असतात. सौदीने घरगुती कामगारांसाठीच्या नियमात एक महत्त्वाचा बदल केला आहे. सौदी सरकारची अधिकृत वेबसाईट सौदी गॅजेटमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.
सौदीने विदेशी घरगुती कामगारांसाठीच्या व्हिसा देण्याच्या नियमात कठोरता आणली आहे.सौदी सरकारनुसार, नव्या नियमांतर्गत सौदीतील अविवाहित महिला किंवा पुरुषाला विदेशी घरघुती कामगाराला कामावर ठेवणे अवघड जाणार आहे. आता सौदीच्या अविवाहित नागरिकाला २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच घरगुती कामासाठी विदेश कामगाराला कामावर ठेवता येणार आहे. या अटीची पूर्तता झाल्यानंतरच विदेशी व्यक्तीला व्हिसा दिला जाणार आहे.मोठ्या संख्येने भारतीय नागरिक सौदीमध्ये कामासाठी जात असतात.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, जवळपास २६ लाख भारतीय सौदी अरेबियात काम करत आहेत. यापुढे भारतासह इतर देशातील नागरिक २४ वर्ष पूर्ण झालेल्या अविवाहित सौदी नागरिकाच्या घरी काम करु शकणार आहे.रिपोर्टनुसार, घरगुती कामगारांच्या भरतीसाठी एका वेगळ्या Musaned व्यासपीठाची स्थापना केली जाणार आहे. यानुसार, कामगारांना व्हिसा दिला जाणार आहे. तसेच कामगारांचे कर्तव्य, अधिकार याची माहिती येथेच दिली जाणार आहे. घरगुती श्रम बाजारामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदीच्या मानव संसाधन मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
नव्या व्यासपीठावर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच Musaned या व्यासपीठावरुन वादांचे निराकरण देखील केले जाणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तसेच नियुक्ती करणारा आणि श्रमिक कामगार यांच्यामधील अधिकार सुनिश्चित करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. घरगुती कामगारांमध्ये विविध श्रेणी आहेत. यात नौकर, सफाई कर्मचारी, गार्ड, शेतकरी, शिंपी, लिव्ह-इन-नर्स, ट्यूटर, स्वंयपाकी यांचा समावेश होतो.