कोल्हापूर : पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी मंगळवारी (दि. २१) पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील गृह प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. मुख्यालयातील दोन्ही इमारतींचे काम येणा-या दिवाळीपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केल्या.

आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या गृह राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलिसांसाठी एकूण १७२८ सदनिकांना मंजुरी मिळवली होती. त्यापैकी पोलिस मुख्यालय, लक्ष्मीपुरी आणि इचलकरंजी येथील गृह प्रकल्पांचे काम गतीने सुरू आहे.
मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी पोलिस लाईन येथील इमारतींच्या कामांची पाहणी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी केली. पोलिसांसाठी सुविधायुक्त सदनिका तयार व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याची सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केली.
तसेच येणा-या दिवाळीपूर्वी पोलिस मुख्यालयातील दोन्ही इमारतींचे काम पूर्ण कराच, असा आग्रह आमदार पाटील यांनी धरला. त्यानुसार कामांची गती आणखी वाढवली जाईल, अशी ग्वाही ठेकेदारांनी दिली. यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक राजेंद्र माने, आदी उपस्थित होते.
काँक्रीट स्ट्रक्चरची १७ मजली इमारत
पोलिस मुख्यालयातील दोन्ही इमारती १७ मजली असून, त्या काँक्रीट स्ट्रक्चरपासून बनवल्या जात आहेत. यात दगड, विटांचा वापर होत नाही. दोन्ही इमारतीत प्रत्येकी १०२ सदनिका आहेत. प्रत्येक सदनिका ५२५ स्क्वेअर फुटांची आहे.
मॉडेल सदनिका तयार होणार
फरशीपासून ते लाईट फिटिंगपर्यंत सर्व सुविधा असलेली मॉडेल सदनिका तयार करण्याची सूचना आमदार पाटील यांनी ठेकेदारांना केली आहे. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत एक सदनिका तयार केली जाणार आहे. प्रत्यक्ष पोलिसांच्या कुटुंबीयांकडून त्याची पाहणी करून सुविधांबद्दल सुधारणा केल्या जातील, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली.
अशा होणार सदनिका
पोलिस मुख्यालय – २०४
लक्ष्मीपुरी – ९६
इचलकरंजी – २००
नंदवाळ – २१६
………………..