कोल्हापूर: आमचा बांध दाबला तर दोन दोन पिढ्या बोलत नाही, आमचं आरक्षण घेतलं असेल तर आम्ही काय करू ते बघाच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.आज लाखाने कुणबी नोंदी सापडत आहेत, पण आपल्याला चारी बाजूनं घेरलं आहे, सावध राहा. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि मराठा ओबीसीमध्ये जाणार असल्याचं समजल्यापासून अनेकांचा तिळपापड सुरू झाला आहे. मनोज जरांगे यांनी आज कोल्हापुरात जाहीर सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडायला सुरू झाल्यापासून एकाचं तर लईच चाललं आहे. मी घाबरणार नाही, पठ्ठ्या आहे. टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच आम्ही. त्या व्यक्तीबद्दल मला आदर होता, पण आता वयाच्या मनाने बरळत आहे. आमचं जेवण तुम्ही काढून घ्यायला लागला. मला तर तुमचं सगळंच माहीत आहे, मुंबईत काय काय करता ते. आतापर्यंत आमच्या लोकांचं रक्त गोचिडा सारखं प्यायला म्हणूनच तळतळाट लागला आणि तुम्ही तुरुंगात बेसन खायला लागला.
त्या व्यक्तीला वेळीच आवरावं, नाहीतर…
मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, सरकारने त्या व्यक्तीला वेळीच आवरावं. नाहीतर आम्हाला जशास तसे उत्तर द्यावं लागेल. आम्ही शांत आहे, शांत राहू द्या. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. आम्हाला शांततेत आंदोलन करायचं आहे. सरकारने त्यांना शांत बसायला सांगावे.
आमचा बांध दाबला तर दोन दोन पिढ्या बोलत नाही, आमचं आरक्षण घेतलं असेल तर आम्ही काय करू ते बघाच. मला असं समजलं आहे की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. मग अजित पवार आणि बाकीचे कुठं जातील
अशी संधी पुन्हा येणार नाही
ज्यांना कुणबीची लाज वाटते त्यांनी शेती विकून अमेरिकेला जावं. गोरगरीब जनतेला काही मिळायला लागलं की मीठ घालू नका. आंदोलनात यायचं नसेल तर येऊ नका, पण विरोध करू नका. खूप वर्षे मराठा समाजाने सोसलं आहे. यांनी अनेक डाव आखले पण यांचे सगळे डाव मी उधळून लावले आहेत. पण सगळे सावध राहा, अशी संधी पुन्हा येणार नाही.
अनेकांना राजकारणात साहेब केलं, आता एकही साहेब रस्त्यावर येत नाही
कोण काय बोलत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्यात राजकारण येऊ देऊ नका. आपणच सगळ्यांना साहेब केलं पण आता आपल्या लेकरासाठी एकही साहेब रस्त्यावर येत नाही. आपण त्यांना नेते केले, त्यांच्या पोरांना दादा, नाना केलं. पण आता आपल्या पोरांसाठी एकत्र या. आपण एकटे 50 टक्के आहोत, कुणी काहीच करत नाही आपल्यासाठी.