प्रदूषण मुक्त दिवाळी करून ग्रंथालय समृद्ध करा – सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)’फटाकेमुक्त व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा. त्याच पैशातून विद्यार्थ्यांनी घरात ग्रंथालय सुरू करावे अथवा शाळेतील ग्रंथालय आणखी समृध्द करावे’, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.

शिक्षण विभागातर्फे त्यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे, फटाक्यांची आतषबाजी क्षणभर राहते, मात्र ज्ञानाची रोषणाई आयुष्यभर राहते. न आणल्याने पैशांची बचत होणार आहे. त्यातून घरातच २० पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करा. ही पुस्तके घरातील सर्वच सदस्यांच्या ज्ञानात भर घालतील. जी भविष्याची शिदोरी असेल.

दिवाळी हा सण विद्युत रोषणाईचा मानला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे ध्वनी व हवा प्रदूषण होवून त्याचा पर्यावरणावरही मोठा परिणाम होतो. त्याचा विपरित परिणाम मानवी जीवनावर व पशू, पक्ष्यांवरही होतो.
शाळास्तरावर या उपक्रमांची सुरूवात झाली तर देशाची भावी पिढी पर्यावरण व मानवी आरोग्याविषयी अधिक जागरूक होण्यास मदत होणार आहे.विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या घरी व शाळेमध्ये समृध्द वाचनालय निर्माण होतील, पैश्याच्या बचतीची सवय लागेल व घेतलेल्या पुस्तकांच्या वाचनातून मुलांचा भावनिक, बौध्दिक व सामाजिक विकास होईल. या सर्वातून वाचन संस्कृती बरोबर त्यांची वाचन गती व अकलन क्षमतेमध्ये वृध्दी होईल.
हा उपक्रम उत्कृष्ट प्रकारे शाळास्तरावर राबवण्यात यावा .शाळा स्तरावर या उपक्रमांची सुरुवात झाली तर देशाची भावी पिढी पर्यावरण व मानवी आरोग्याविषयी अधिक जागृत होण्यास मदत होईल, शिवाय वाचन संस्कृतीच सक्षम होण्यास मदत होईल. त्याच बरोबर “फटाक्यांची रोषणाई क्षणभर : ज्ञानाची रोषणाई आयुष्यभर !” हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचेल.