कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 70 वर्षाच्या परंपरेनुसार 65 वी महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धा धाराशिव (उस्मानाबाद) या ठिकाणी दिनांक 16 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत संपन्न होणार असून या अधिकृत राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर शहर विविध वजनी गट संघ निवडीसाठी जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा दिनांक 4 व 5 नोव्हेंबर 2023 रोजी सिद्धनेर्ली ता.कागल या ठिकाणी माती व गादी विभागात घेण्यात येणार आहे.
तरी या अधिकृत स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेसाठी सर्व पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व कोणत्याही अनाधिकृत व मोठ्या बक्षिसांच्या अमिषाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये असे आवाहन कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले आहे.
पुणे शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघामध्ये वाद आहे. या वादातून काही विघ्नसंतोषी मंडळींनी स्वार्थासाठी क्रीडा क्षेत्रामध्ये राजकारण आणून राज्य कुस्तीगीर परिषदेवर चुकीचे खोडसाळ आरोप करून कुस्ती क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करून त्याचे प्रत्युत्तर म्हणजे सन 2019 च्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीत राजकारण करून स्वतंत्र पॅनल उभे केले होते पण अशा क्रीडा क्षेत्राला बदनाम करून या क्षेत्राला राजकारण करू पाहणाऱ्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले. त्याचे शल्य मनात ठेवून या विघ्न संतोषी मंडळींनी दिल्लीच्या भारतीय कुस्ती महासंघाकडे राज्य कुस्तीगीर परिषदेत विरोधी चुकीचे आरोप करून वशिलेबाजीतून राज्य कुस्तीगीर परिषदच बरखास्त केली. भारतीय कुस्ती महासंघाने घेतलेल्या या चुकीच्या निर्णया विरोधात कुस्तीगीर परिषदेने उच्च न्यायालयात यावर दाद मागितली असता मा. उच्च न्यायालयाने भारतीय राज्यस्तरीय संघटना बरखास्त करता येणार नाहीत असे आदेश देऊन राज्य कुस्तीगीर परिषद अबाधित ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही 70 वर्षाची अधिकृत संघटना आहे या संस्थेला उच्च न्यायालयानेही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेच्या कोणत्याही स्पर्धेची प्रमाणपत्रे शासकीय नोकरी व अन्य सवलतींसाठी अधिकृत ग्राह्य धरली जातात.असे असतानाही काही विघ्नसंतोषी मंडळी त्याच नावाने अनाधिकृत कुस्ती स्पर्धेसाठी मोठमोठ्या बक्षीसांची आमिषे दाखवून पैलवानांना दिशाभूल करून त्यांचे नुकसान करीत आहेत याचे उदाहरण द्यायचे झाल्यास मागील वर्षी पुण्यात घेतलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची प्रमाणपत्रे पैलवानांना नोकरीस अन्य सवलतींसाठी ग्राह्य धरली जात नाहीत याचा अनुभव अनेकांना आला आहे.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने या विघ्नसंतोषी मंडळींना जाहीर विनम्र आव्हान करण्यात येते की पुण्याच्या कुस्ती क्षेत्रातील वाद हा पुणे जिल्ह्याचा आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तालीम संघ, पैलवान कुस्तीगिरांना वेठीस धरू नका. मोठमोठ्या बक्षिसांची आमिषे दाखवून एकाच वेळी अनाधिकृत समांतर स्पर्धा जाहीर करून नवोदित पैलवानांमध्ये गोंधळ करून नुकसान करून पर्यायाने भारत देशाला महाराष्ट्रातून कुस्ती क्षेत्राला अव्वल खेळाडू मिळण्यासाठी वंचित ठेवू नका. तुमचे राजकारण थांबवून महाराष्ट्राची कुस्ती सातासमुद्रा पलीकडे नेण्यास सहकार्य करावे असे आवाहन आहे.