पुणे : निवडणुकीच्या वेळी शेवटपर्यंत कळलं नाही, ते नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहेत. अजूनही ते नेमके कुठे आहेत, हे आजपर्यंत कळलेलं नाही, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांना चिमटा काढला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष रिंगणात उतरलेल्या तांबेंना भाजपने पाठिंबा दिल्याची चर्चा होती.
ज्यांच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक मोठं कन्फ्युजन होतं, की हे नेमके कोणाचे आहेत. ते शेवटपर्यंत क्लिअर नाही झालं, आजपर्यंतही नाही झालं, ते विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे, असा उल्लेख चंद्रकांतदादांनी त्यांचं स्वागत करताना केला.माजी आमदार विनायक निम्हण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनकडून गुरुवारी आयोजित केलेल्या विनायकी गौरव शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात चंद्रकांतदादा बोलत होते.