माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे राज्यातील एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर पागोरी पिंपळगाव येथे उद्या शनिवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही भाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. बबनराव ढाकणे हे विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते.

ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून बबनराव ढाकणे परिचित होते. तीन वेळा विधानसभा सदस्य, एकवेळ विधान परिषद सदस्य, एक वेळ खासदार व त्याचवेळी केंद्रीय उर्जा राज्यमंत्रीपद भूषवलेले बबनराव ढाकणे परिवारात व ऊस तोडणी विश्वात साहेब म्हणून परिचित होते. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. संघर्षयोद्धा म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, ते माझे वडील होते, पण त्यापेक्षा जास्त माझे ते गुरू होते. मला घडवून माझ्यात संघर्ष रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने मी पोरका झालो आहे, असे प्रतापराव ढाकणे यांनी म्हटले.