विवेकानंद कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

कोल्हापूर : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी सामान्यपण जपत असामान्य कर्तृत्व केले. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्यासारख्या थोर विभुतीबरोबर संसार करताना गरीबी, अडचणी आणि आव्हाने यांच्याशी दोन हात करीत संस्थेच्या प्रसार आणि विस्तारासाठी सारे आयुष्य वेचले. कुटूंब, संस्था, गुरुदेव कार्यकर्ते यांच्याशी स्नेहभावाने व आईच्या मायेने त्यांनी प्रेम केले. संस्थेच्या प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याला आपल्या परिवारातील समजणाऱ्या आणि त्यावर लेकरासारखी माया पांघरणारी संस्थामाता खऱ्या अर्थाने समर्पित आयुष्य जगल्या!”. असे मत प्रा.शिल्पा भोसले यांनी मांडले.

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित संस्थामाता वैचारिक जागर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.गीतांजली साळुंखे यांनी संस्थामाता सोबतच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत संस्थामातेंच्या संस्काराचा आमच्या जीवनामध्ये महत्वाचा वाटा आहे असे विचार मांडले. पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

याप्रसंगी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. एम.ए.कुरणे यांच्या हस्ते करणेत आले. आभार प्रा.एस.एस.अंकुशराव यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. कैलास भोसले यांनी केले. यावेळी ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.