शाहू स्मारकला रंगणार ‘काव्यांगण’ ; २८ ऑक्टोबर रोजी युवा कवींची बहारदार काव्यमैफिल

कोल्हापूर : लोकराजा उर्जा मैत्री परिवार आयोजित ‘काव्यांगण’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन शनिवार २८ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात होत आहे. छत्रपती शाहू स्मारक भवन मध्ये दुपारी ४:३० वाजता ही मैफिल रंगणार असून सर्व रसिकांना याचा मोफत लाभ घेता येणार आहे. अशी माहिती लोकराजा ऊजा मैत्री परिवाराचे सदस्य सुनिल दळवी, विश्वास पाटील, विशाल पाटील, दिग्विजय देसाई, राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षणासाठी एकत्र आलेल्या आणि शाहू विचारांनी प्रेरित झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या उद्देशाने ‘लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारा’ची स्थापना केल्याचे सुनिल दळवी यांनी सांगितले. या परिवाराच्या माध्यमातून दरवर्षी अनेक सामजिक व सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. ‘काव्यांगण’ हा त्यापैकीच एक होय. मागील वर्षी लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या ‘काव्यांगण’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद पाहता यावेळी अधिक उत्तम तयारी करण्यात आल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.
प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार, कवी विजय चोरमारे व मान्यवरांच्या उपस्थितीत कविसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. पूजा भडांगे (बेळगाव), रोहित शिंगे (इचलकरंजी), प्रशांत ठाकरे (अकोला), विशाल मोहिते (बुलढाणा), प्रमोद घोरपडे (अहमदनगर), विश्वास पाटील (राधानगरी), विनय पाटील (जळगाव), रत्नमाला शिंदे (मुंबई) असे सुप्रसिद्ध कवी या कविसंमेलनात सहभागी होणार आहेत. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असून रसिकांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन ऊर्जा मैत्री परिवाराकडून करण्यात आले आहे.

🤙 9921334545