दसरा चौकातील सीमोल्लंघन सोहळ्याच्या जय्यत तयारी

कोल्हापूर ः येथील शाही दसरा सोहळ्याला यंदा शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा उद्या (मंगळवारी) पारंपरिकतेचा बाज कायम ठेवत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

परंपरेप्रमाणे सूर्यास्तावेळी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी दसरा चौकात सोहळा होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले आहे. 

परंपरेप्रमाणे साडेपाचच्या सुमारास श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई देवीबरोबरच गुरुमहाराज वाड्यातील पालख्यांचे दसरा चौकाकडे प्रस्थान होईल. पालख्या येताच नवीन राजवाड्यावरून मेबॅक गाडी आणि लवाजम्यासह छत्रपती परिवाराचे आगमन होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्री अंबाबाईची पालखी सिध्दार्थनगर मार्गे पुन्हा मंदिरात जाईल. परिसरात करमणुकीची साधने आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी हजेरी लावली असून येथे जत्राच भरणार आहे. 

पारंपरिक वाद्यांचाही थाट

पालखीसोबत पारंपरिक लवाजम्यासह ध्वजवाहक घोडा, दहा घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी (अब्दागिरी), त्यानंतर ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक, २०० पैलवान, चार उंट असाही लवाजमा असणार आहे. ढोलपथक, लेझीम व धनगरी ढोल पथकांचाही सहभाग असेल. नवीन राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे पथक स्वागताला उभे राहणार आहे. शाही मिरवणुकीच्या दोन्ही मार्गांवर फुलांचा सडा, रांगोळ्या सजणार असून भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर पारंपरिक पद्धतीने बारा स्वागत कमानी उभारल्या आहेत.