राधानगरी (अरविंद पाटील) : रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. धामोड येथिल संघर्ष कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाकडुन दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत चालणार असल्याने नवरात्रीच्या तयारीसाठी भाविकांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत आहे.
दुर्गा उत्सवादरम्यान नऊ दिवस मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दांडीया नृत्यांची रेलचेल राहते. पहाटेपासून सुरू होणा-या पूजा-अर्चेमुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. नवरात्र दरम्यान अनेक भाविक उपवास पकडत असल्याने नवरात्रीचे विशेष महत्त्व भाविकांनाही जाणवते.
चालू वर्षी गावातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योगपती सुधाकर चौगले यांनी देवीची मूर्ती दिली आहे.काल नदीघाटापासुन मंडळाच्या प्रतिष्ठापना मंडपापर्यंत दुर्गा मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोईवर कलश घेऊन पारंपारिक पद्धतीने स्त्रिया, लहान थोर, आबालवृद्धांनी, मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
