नवी दिल्ली : ईस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता इराणने उडी घेतली आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव सुरू केला आहे. इस्त्रायलने जवळपास 6 हजार बॉम्ब येथे टाकले असून यात इमारतींसह पायाभूत सुविधा जमिनदोस्त झाल्या आहेत.
गाझाचे पाणी, वीज आणि अन्नही इस्त्रायलने बंद केले आहे. यामुळे इराण चवताळून उठला असून गाझा पट्टीवरील बॉम्बवर्षावर बंद केला नाही तर चौफेर युद्ध सुरू होईल अशी धमकी इरानने इस्त्रायलला दिली आहे.
पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गेल्या शनिवारी इस्त्रायलमध्ये हल्ले केले. हमासने जवळपास 5 हजार रॉकेट्स इस्त्रायलवर डागले. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलची सीमा भेदून आत प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार, लुटपाट केली. काही नागरिकांना ओलीसही ठेवले. याला इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले असून पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली.
दोन्ही बाजुने घमासान युद्ध सुरू असून यात आतापर्यंत 4 हजारांहून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. इस्त्रायलने गाझा पट्टी बेचिराख करण्याचा आणि हमासचा नष्ट करण्याचा विडा उचलला असून तुफान बॉम्बहल्ले सुरू केले आहेत.इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे हमासचे कंबरडे मोडले आहे. मात्र दुसरीकडे इराणला हमासचा पुळका आला असून त्यांनी इस्त्रायलला धमकी दिली आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीरबदोल्लाहियन हे गुरुवारी रात्री लेबनानची राजधानी बेरूतला पोहोचचे. इथे त्यांनी लेबनानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.गाझा पट्टीमध्ये सुरू असले युद्ध, घेराबंदी आणि बॉम्बहल्ले यामुळे अन्य मोर्चावरही युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.
गाझावरील बॉम्बवर्षाव सुरुच राहिला तर अन्य मोर्चावरही युद्ध सुरू होईल, अशी धमकी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीरबदोल्लाहियन यांनी दिली. याआधी त्यांनी इराकच्या दौऱ्यावर असतानाही असे विधान केले होते.अमेरिका इराणवर नवीन निर्बंध लादणारअमेरिकेने इराणवर नवीन निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांविरोधातही अमेरिका कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. इराणकडून हमासला मदत पुरवली जात असल्याबाबत अनेक सवाल केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर इराणवर नवे निर्बंध लादण्याचे संकेत अमेरिकेचे ट्रेजरी सेव्रेटरी जेनेट येलेन यांनी दिले.