रंकाळा तलाव संवर्धनासाठी ३.५८ कोटी निधी मंजूर : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रंकाळा तलाव संवर्धनकामी तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती करणे करीता २ कोटी ५६ लाख रुपये तर संध्यामठ व धुण्याची चावी या ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करण्याकरिता एक कोटी दोन लाख असा एकूण तीन कोटी ५८ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.

कोल्हापूर हे धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रीडा क्षेत्रांच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. तसेच शाहूकालीन कोल्हापूरच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकणार्या अनेक हेरिटेज वास्तू दिमाखात उभ्या आहेत. अंबाबाई मंदिर व जोतिबा येथे दर्शनासाठी येणारे भाविक, पर्यटक रंकाळ्याला आवर्जून भेट देतात. रंकाळा तलाव कोल्हापुरातील जनतेचे तसेच पर्यटकांच्या विरंगुळ्याचे व जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे काम प्रस्तावित केले आहे.

रंकाळा तलावाच्या सभोवतालच्या नादुरुस्त झालेल्या लहान दगडी भिंतींची दुरुस्ती करणे करीता २ कोटी ५६ लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच संध्यामठ व धुण्याची चावी या ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करण्याकरिता एक कोटी दोन लाख २८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच कामाला प्रारंभ करावा अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याच्या आमदार जाधव यांनी सांगितले.

रंकाळा तलावाचे नैसर्गिक, पुरातन व ऐतिहासिक सौंदर्य झाकोळले आहे. बांधकाम कमकुवत झाले आहे. नागरीकांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंकाळयाचे संवर्धन व सुशोभिकरण करणे गरजेचे असून, त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

🤙 9921334545