
कोल्हापूर: कुछ नंबर दुनिया बदल देते हैं या ब्रीदवाक्याने 27 वर्षापूर्वी चाईल्ड इंडिया फौंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली 1098 ही लहान मुलांची हेल्पलाईन सेवा आजपासून जिल्हास्तरीय महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे पुढील काळात संकटात सापडलेल्या बालकाची जबाबदारी आता महिला बालविकास घेणार आहे.
0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी चाईल्ड इंडिया फौंडेशन, मुंबई या एनजीओ च्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा 24 तास कार्यरत होती. यामध्ये हरवलेले बालके, बालकांची तस्करी, अनाथ निराधार बालके,बालकाला आश्रयाची गरज, बालभिक्षेकरी,बालकामगार, बालकाचे शारीरिक अथवा मानसिक शोषण होत असल्यास आशा प्रकारच्या संकटातून बालकाला सोडविण्याचा प्रयत्न सुरू होता.भारतभर सुमारे 1000 एनजीओ व 11000 कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यरत होती. या यंत्रणेमध्ये कार्यरत मनुष्यबळ हे तुटपुंज्या मानधनावर कार्यरत होते. मिशन वात्सल्य अभियानाअंतर्गत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने ही यंत्रणा चाईल्ड इंडिया फौंडेशन कडून अचानक काढून प्रत्येक राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे भविष्यात संकटात सापडलेल्या बालकासाठी चालणारी यंत्रणा कशी चालणार हा येणारा काळच ठरवेल.
