कोल्हापूर : आपल्या राज्याला विविधतेने भरलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती लाभली आहे. या पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची ओळख जगभरात निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मधुराज रेसिपीच्या संस्थापिका मधुरा बाचल यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिट्यालिटीच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्याच्या स्वागत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेशकुमार मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमा झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी नामांकित हॉटेलमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक प्राध्यापक सुरज यादव यांनी मधुरा यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना मधुरा यांनी सतत प्रयोग करत राहण्याची सवय आपल्याला चांगला शेफ बनवू शकेल असा कानमंत्र दिला. हॉटेल व खाद्य उद्योग हा सतत वाढत जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांनी मनापसून या हॉटेल इंडस्ट्रीजचा अभ्यास केला तर उज्ज्वल भविष्य समोर उभे राहील. आपल्या हाताची महाराष्ट्रीयन चव जागतिक पातळीवर अभिमानाने पोहचवा असे आवाहन त्यानी केले. यावेळी विद्यार्थी व पालाकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे त्यानी निरसन केले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विद्यापीठाच्या प्रगती व यशाबाबतची संपूर्ण माहिती दिली. कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी विविध अभ्यासक्रम, त्यामधील संधी याबाबत मार्गदर्शन केले. सुप्रीता जोशी यांनी आभार मानले. कुलपती डॉ संजय डी. पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. अद्वैत राठोड, रुबेन काळे, सुरज यादव, विशाल नारखेडे, राहुल दाते यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.