आई-वडिलांसाठी माणगाव ग्रामपंचायत ने घेतला “हा” निर्णय

कोल्हापूर : आई- वडिलांची मालमत्ता पैसा हवा पण वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात वाढत आहे. म्हातारपणी आई- वडिलांना सांभाळत नसल्यामुळे त्यांच्यावर निराधार होण्याची वेळ येते. अशा अपप्रवृत्तींना चाप बसावा आणि मुलांनी, आई-वडिलांचा सांभाळ करावा यासाठी हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारसा नोंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत हा ठराव मान्य करण्यात आला.

माणगाव ग्रामपंचायत यासंबंधी प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात येणार आहे. जी मुले व मुली आईवडिलांना सांभाळतील त्यांनाच बापाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारस म्हणून हक्क मिळावे असे वारस नोंदीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे ठरले. प्रतिज्ञापत्रातील मसुदाही निश्चित केला. “मी माझ्या आईवडिलांचा सांभाळ करेन.मी त्यांना दवाखावा अथवा आरोग्याच्या बाबतीत इतरत्र कोणतीही कमतरता भासू देणार नाही. मी माझ्या कर्तव्याचे पालन करीन. माझ्याकडून या सर्व गोष्टीचे पालन झाले नाही अशी तक्रार आली किंवा शेजाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर माझ्या कर्तव्यात कसूर झाल्याचे आढळल्यास ग्रामपंचायती दफ्तरी असिसमेंटला लागलेले नाव तत्काळ कमी करण्यात यावे. तसेच माझ्या घरी असलेले नळ कनेक्शन खंडित करण्यात यावे. याबाबत मी, कोठेही कसलीही तक्रार करणार नाही.”असे प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे.

14 ऑगस्ट रोजी माणगाव ग्रामपंचायतीची सभा झाली. ग्रामसभेत हा २४ नंबरचा विषय होता. या ठरावाचे सूचक समीर अल्लाउद्दीन जमादार यांनी तर अनुमोदक दिपक महाजन आहेत.ग्रामसभेने हा ठराव मान्य केला.आई-वडिलांची संपत्ती मुलांच्या नावे झाल्यावर म्हातारपणी मुले पालकांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या. माणगाव ग्रामस्थांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माणगाव पंचक्रोशी या निर्णयाचे कौतुक होत आहे.

जी मुले आई-वडिलांचा सांभाळ करणार नाहीत अशा मुलांचा वारसा असिसमेंटवरील नाव कमी करण्याचा ठराव ग्रामसभेत पास केला. यासंबंधी मुलांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मुलांना चाप बसेल. यामुळे आईवडिलांना अनाथालय व वृद्धाश्रमात ठेवायची वेळ येणार नाही. असे प्रतिपादन माणगाव ग्रामपंचायत सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी केले.