
कोल्हापूर : ‘महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज’ उपक्रमाबाबत व्यापक जागृती करुन अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना करुन नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले.

महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज बाबत आढावा बैठक तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालयांतील कौशल्य विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच सदस्य उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली म्हणाले, राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेऊन त्यांच्या नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी तसेच त्यांना योग्य ते पाठबळ पुरवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये माहितीपर सादरीकरण सत्र आयोजित करुन सर्वोत्कृष्ट 2 संकल्पना कौशल्य विकास विभागाकडे सादर कराव्यात. उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी www. msins.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागणी करण्यात येईल. यानंतर संस्था स्तरावर सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून प्रत्येक संस्थेतील सर्वोत्कृष्ट दोन संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील उत्तम 100 संकल्पनांची सादरीकरणासाठी निवड करण्यात येणार असून त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यानंतर या संकल्पनांचे जिल्हास्तरावर सादरीकरण होणार असून या 100 संकल्पनातून जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या 10 विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे, अशी माहिती संजय माळी यांनी दिली. याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट दहा विजेत्यांना म्हणजेच राज्यातील एकूण 360 नवं उद्योजकांना बारा महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय 360 संकल्पनांच्या सादरीकरणातून राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट पहिल्या दहा विजेत्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे, असेही श्री. माळी यांनी यावेळी सांगितले.
