
कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कसबा बावडा, बिरंजे पाणंद येथील ज्योर्तिंलिंग जयसिंग नाईक (वय १९) वर्षे या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे.

यानंतर आरोग्य स्वच्छता विभागामार्फत या परिसरातील स्वच्छता, किटकनाशक विभागामार्फत औषध व धूर फवारणी तातडीने करण्यात आली.या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत.
डेंग्यू हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात तयार होतो. खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवडयातुन एक वेळ कोरडे करुन घासून पुसून स्वच्छ करुन ठेवावीत. एक दिवस कोरडा दिवस पाळावा, नारळाच्या करवंटया, न वापरातील डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी, झाडांच्या कुंडया, फ्रिज च्या मागील ट्रे यामध्ये पाणी साचू देऊ नये, संशयीत तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत,असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
