
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यातच बाल लैंगिक शोषणाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यांवर सखोल विवेचन केलं. महिला बेपत्ता होण्यात आणि बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र कितवा आहे याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. तसेच महिला बेपत्ता झाल्याच नाही पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केले.विधान परिषदेत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. त्याला देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. सर्वोच्च न्यायालयाने महिला आणि बालके गायब होत असल्याने काही निर्बंध टाकले आहेत. महिला किंवा मुले गायब झाल्यास 72 तासांत तो एफआयआर करावा लागतो. त्यांना किडनॅप केले किंवा पळवून नेले या दृष्टीने तपास करावा लागतो. त्यातही महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 17वा आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
