कोल्हापुरात शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी द्या – आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर :महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत शिवनेरी, गोराई, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि रामटेक

 

येथे शिवसृष्टी संग्रहालय तसेच शिवकालीन थीम पार्क उभारण्यासाठी 410 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.कोल्हापूर जिल्हा हा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा असून अनेक गडकिल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. कोल्हापुरातील पन्हाळगडाचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पन्हाळा पावनखिंड मोहीमेत राज्यभरातून हजारो शिवभक्त सहभागी होत असतात. त्याचबरोबर विशाळगड, रांगणा, भुदरगड यासारख्या किल्ल्यांवरही शिवभक्तांचा राबता असतो. ही बाब ध्यानात घेऊन कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवरायांचा इतिहास अवगत होण्यासाठी कोल्हापुरातही शिवसृष्टी, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्क उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन केली. कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारची शिवसृष्टी साकारल्यास स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच ऐतिहासिक वारशाचे जतन संवर्धन होण्यास मदत होईल अशा भावना आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या.

त्याचबरोबर विविध शासकीय विभागांची विभागीय कार्यालय कोल्हापुरात सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर उचित निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली.

🤙 8080365706