
कागल : छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी कागल आणि परिसराचे नंदनवन केले.आजच्या परिस्थितीत स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सारख्या विचारांची गरज आहे.त्यांचाच कार्याचा आणि विचारांचा वारसा शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे पुढे चालवीत आहेत. यांना कागलकरांनी साथ द्यावी व येत्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आमदार करून प्रत्यक्ष कृतीतून स्व. घाटगे यांना आदरांजली अर्पण करावी.असे आवाहन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व दुर्गभ्रमंतीकार डाॕ.शिवरत्न शेटे यांनी केले.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जयंती निमित्त खर्डेकर चौकातील श्री. राम मंदिर समोर आयोजित ‘असे होते विक्रमसिंहराजे’ या विषयावरील व्याख्यानवेळी ते बोलत होते. यावेळी स्व.घाटगे यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रफितीचे प्रसारण केले. व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे, यशराजे घाटगे शाहू साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ शेटे पुढे म्हणाले, स्व घाटगे यांनी परिसराच्या भौतिक विकासाबरोबर समाज घडविला. सहकार, शेती,अर्थ, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक,धार्मिक अशा सर्वच क्षेत्राला त्यांचा परिस स्पर्श लाभला. मात्र अस्तनीतील निखाऱ्याने त्यांना दगा दिला. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले हे व्यक्तिमत्व मर्यादितच राहिले. त्यामुळे केवळ कागलचे नव्हे तर राज्याचे नुकसान झाले आहे. कागलकरांनी आता ही चूक त्यांचे वारस राजे समरजितसिंह घाटगे यांच्या आमदारकीच्या रुपाने दुरुस्त करावी.शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले स्व राजेसाहेब यांचा 1985 मध्ये राजकारणातील कट कारस्थानामुळे पराभव झाला. त्यानंतर राजे गट गुलालापासून वंचित राहिला आहे. कागलच्या आमदारकीचा राजे गटाचा कोंढाणा येत्या विधानसभेच्या निवडणुकीत परत मिळवण्याचा निर्धार त्यांच्या जयंतीनिमित्त करूया .आभार शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी मानले.
तरुण पिढी घडवणारा की बिघडवणारा पाहिजे हे ठरवा..
स्व. राजेसाहेब यांनी तरुण पिढी घडवण्यासाठी संस्कार केले. तर काहींनी धाबा संस्कृतीतून ती बिघडवण्याचे काम केले .त्यामुळे कागलला तरुण पिढी घडवणाऱ्यांचा वारसदार पाहिजे की बिघडवणारा पाहिजे.हे सुज्ञ कागलकरांनी ठरवावे. असे आवाहन शेटे यांनी यावेळी केले.
आणि डोळ्यात अश्रू उभारले
स्व.राजे जर कागल मध्ये जन्मले नसते तर या भागाचा कायापालट झाला असता का? याची कल्पना करा.असे सांगत डॉ शेटे यांनी दुष्काळी भागातील कुटुंबातील काही कटू प्रसंग सांगितले .त्यावेळी डॉक्टर शेटे यांच्या सह सर्वांच्याच डोळ्यात अश्रू उभारले.
