शेतकऱ्यांची कर्जाची थकीत रक्कम तातडीने भरण्याची मागणी

कोल्हापूर : दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करूनही राज्य सरकारच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे सिबील खराब होऊन त्यांना कोणतीच बँक कर्ज द्यायला तयार नाही. राज्य सरकारने यावर तातडीने उपाययोजना करून संबंधित शेतकऱ्यांची कर्जाची थकीत रक्कम तातडीने भरावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी दोन लाखावरील कर्ज भरल्यास उर्वरीत कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर सर्व थकीत शेतकऱ्यांनी दोन लाखावरील सर्व कर्जे भरली. मात्र राज्य सरकारने थकीत असलेले तसेच दोन लाख कर्जमाफीत माफ झालेली रक्कम बँकांना भरलेले नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी कर्ज भरून देखील थकीत गेले आहेत. वास्तविक ही राज्य सरकारची जबाबदारी होती. थकीत असलेले कर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेतले. मात्र माफ केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यात सरकारने भरले नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. सध्या सर्वत्र पेरणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.

आम्ही वेळोवेळी मागणी करून देखील राज्य सरकारने अद्यापही याची दखल घेतलेली नाही. थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने विनाअट कर्ज मिळवून द्यावे, तसेच शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने बँकांना देऊन शेतकऱ्यांना सिबीलची अट न लावता बँकांना कर्ज देण्यास योग्य ते निर्देश द्यावेत. यासाठी राजू शेट्टी यांनी आरबीआयचे गर्व्हनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यसचिव, सहकारमंत्री, अर्थ सचिव, कृषि विभागाचे सचिव, सहकार सचिव आदींकडे ही मागणी केली आहे.

🤙 8080365706