
कल्याण : कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून कल्याण, डोंबिवली आणि उल्हानगरात दोन्ही गटाकडून पोस्टरवार सुरू झालं. त्यातच भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भाजपकडून पहिल्यांदाच ही टीका करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटही चवताळला आणि त्यांनीही बोंडे यांची औकात काढली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कल्याणमध्ये शिंदे गटाचा मेळावा होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपली युती नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या भावना आवरा. युती धर्म पाळा. एकत्र येऊन काम कराल तर काम चागल होतंय, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावले. तसेच उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांनी पोस्टर लावल्याचंही त्यांनी सांगितलं.
