
मुंबई: गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान असून अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तसेच आजचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्त्वाचा असून गेली अनेक वर्षे गिरणी कामगारांना घरे मिळणार अशी फक्त चर्चा होत होती. आज मात्र प्रत्यक्षात गिरणी कामगारांना घरांच्या चाव्यांचे वाटप झाले. गिरणी कामगारांना प्रत्यक्ष चाव्या आणि पत्र दिले जात आहेत. सन 2020 मधील गिरणी कामगार सोडतीतील उर्वरित सुमारे 3500 यशस्वी गिरणी कामगार/वारस यांना येत्या 3 महिन्यांत सदनिकांचा ताबा देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सदनिकेच्या चाव्या मिळत असलेल्या गिरणी कामगारांना सदनिका विक्री किंमतीचा भरणा उशिरा केल्याबद्दल लावलेला दंड माफ करून 1 जुलै 2023 पासून सदनिकेसाठीचा देखभाल- दुरुस्ती खर्च आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
