
ठाणे : उल्हासनगर शिवसेनेच्या बॅनर्सला उत्तर देण्यासाठी भाजपने काल रात्री ’50 कुठे आणि 105 कुठे?’ असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. पण हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाला आहे. हा बॅनर चोरीला गेल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

‘प्रत्युत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करून नव्हे!’ असा टोलाही भाजपने शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे आता या बॅनर्स चोरीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्यता आहे.कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्याचे लोण फक्त कल्याण-डोंबिवलीपर्यंत मर्यादित राहिले नसून ते उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहे. एकमेकांच्या विरोधात बॅनर्स लावून दोन्ही पक्षांनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही ’50 कुठे आणि 105 कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!’ असा मजकूर असलेला बॅनर लावला होता. उल्हासनगरच्या 17 सेक्शनच्या चौकात हा बॅनर लावला होता.
