
मुंबई: शेतकरी, महिला आणि युवक हे राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ असून त्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर राज्यात सुमारे दीड लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी निती आयोगाच्या बैठकीत दिली.

तसेच कोकणातील वाया जाणारे पाणी मराठवाडय़ातील दुष्काळी भागात वळविण्यासाठी केंद्राने अर्थसाह्य करावे, अशी मागणीही शिंदे यांनी बैठकीत केली.निती आयोगाच्या गव्हर्निग कौन्सिलची आठवी बैठक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्याची भूमिका मांडताना शिंदे यांनी सरकारने गेल्या काही महिन्यांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि राबविलेल्या योजनांचा लेखाजोखा मोदी यांच्यासमोर मांडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मराठवाडा वॉटरग्रीडसाठी भरीव मदत करण्याची मागणी मोंदी यांच्याकडे केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
