
साळवण : आपल्या गावची प्रश्नांची सोडवणूक आपण स्वतः केली पाहिजे. देश महासत्ता करण्यासाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केली पाहिजे. आपल्या गावचे आर्थिक नियोजन बारकाईने करून नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाहीत. असे परखड मत पेरे पाटलांनी आपल्या विनोदी भाषण शैलीतून व्यक्त केले.

ते लोट्स फौंडेशन व श्री महालक्ष्मी ग्रुप, निवडे ( ता.गगनबावडा ) आयोजित नूतन सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी व तालुक्यातील उच्च पदावर निवड झालेल्या अधिकारी यांचा सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प अध्यक्ष बजरंग पाटील होते. प्रमुख उपस्थिती माजी जि. प सदस्य डॉ भगवान पाटील, माजी पं स सभापती संगीता पाटील, माजी पं स उपसभापती पांडुरंग भोसले, निवृत्ती म्हाळुंगेकर, लोट्स फौंडेशनचे अध्यक्ष निलेश म्हाळुंगेकर होते. पेरे पाटील बोलताना पुढे म्हणाले की, गावातील माणूस वृद्धाश्रमात जावू देवू नये. अशा गरीब, निराधार लोकांना गावानेच सांभाळावे. गावामध्ये फळ झाडांची लागवड करावी. सरकारच्या पैशावर अवलंबून न राहता. गावातील इतर करातून विकास करावा. डोक्यातील विचारांची अडचण दूर केल्यास ग्राम विकास साधू शकतो. प्रास्ताविकेत म्हाळुंगेकर यांनी लोट्स फौंडेशन व श्री महालक्ष्मी ग्रुपच्या कार्य विस्ताराची माहिती दिली. यावेळी गट विकास अधिकारी माधुरी परीट, तहसीलदार शैलेजा पाटील, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, लोट्स फौंडेशन व श्री महालक्ष्मी ग्रुप निवडेचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
