
मुंबई : कोर्टाचा निकाल आला पण लोकशाहीत सर्वात शेवटचे न्यायालय जनतेचे असते. जनतेचा फैसला स्वीकारूया. जनता जे काही ठरवेल ते मान्य करूया असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात एकूणच बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने परखड भाष्य केले आहे. शिवसेनेची स्थापना मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी, भूमिपूत्रांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. पण ही शिवसेना गद्दारांच्या दावणीला बांधण्याचा घाट सर्वोच्च न्यायालयाने उघडा पाडला. अनेकांनी कोर्टाच्या निर्णयावर मत व्यक्त केला आहे. भाजपाने आनंद व्यक्त केला असता तर समजू शकलो असतो. कारण डोईजड ओझं उतरवण्याचा मार्ग कोर्टाने भाजपाला दिला पण जे गद्दार आहेत त्यांनी फटाके वाजवण्याचं कारण समजू शकलो नाही असं त्यांनी सांगितले.
