
इचलकरंजी : महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.विशेष म्हणजे सुरळीत पाणी पुरवठा,कचरा उठाव व गटारींची स्वच्छता यामध्ये ढिसाळ धोरण दिसत आहे.गटारींची स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी साचून त्याला दुर्गंधी सुटू लागल्याने साथीचे आजार फैलावण्याचा मोठा धोका वाढला आहे.याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्याने शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा,कचरा उठाव,गटारींची स्वच्छता,रस्ते अशा विविध मुलभूत नागरी सुविधा मिळण्याची आशा पल्लवीत झाली होती.पण , महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्याकडून या कामांना म्हणावे तसे प्राधान्य दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यात संबंधित लोकप्रतिनिधी देखील याबाबत गांभीर्य दाखवत नसल्याचे आता लपून राहिलेले नाही.या सा-याचा परिणाम म्हणजे शहरातील मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड देण्याची दुर्देवी वेळ आली आहे. महापालिकेच्या या गलथान कारभारात सुधारणा करुन तातडीने मुलभूत नागरी सुविधा देण्याची कार्यवाही करावी , अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
