
मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय कदाचित चुकला असेल. कायदेशीरदृष्ट्या हा निर्णय योग्यही नसेल. पण नैतिकदृष्ट्या मी घेतलेला निर्णय योग्यच आहे. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली. अविश्वास दाखवला त्यांच्यासाठी मी विश्वास दाखवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी राजीनामा दिला. माझ्यात नैतिकता शिल्लक होती म्हणून राजीनामा दिला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जराही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले असून पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.मी कायदेशीररित्या राजीनामा दिला कदाचित चुकीचा निर्णय असेल. ज्या लोकांना माझ्या वडिलांनी सर्व काही दिलं. त्या लोकांनी माझ्यावर बोटं दाखवावीत, त्यांच्यासाठी मी विश्वास किंवा अविश्वास का दाखवण्याचा प्रयत्न करणे शक्य नव्हतं. मला प्रश्न विचारायचा त्यांना अधिकारच नव्हता. गद्दारांनी माझ्यावर अविश्वास आणावा आणि मी त्याचा सामना करावा हे कसं शक्य आहे?, असं सांगतानाच राज्यात सरकारच नाही. या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी जसा मी दिला तसा आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
