
मुंबई : सत्ता संघर्षाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. राऊत यांनी सूचक ट्विट केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ… जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुन्हा झिरवळ यांच्याकडेच पाठवणार असल्याचं राऊत यांना आपल्या ट्विटमधून सूचवायचं आहे. त्यामुळे कोर्ट खरोखरच तसा निर्णय देतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.नरहरी झिरवळ यांनी कायदा आणि घटना तसेच तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय दिला. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आताचे अध्यक्ष सांगतात निर्णय माझ्याकडेच येईल. माझ्याकडे येईल म्हणजे कुणाकडे येईल? तुम्ही बायस आहात. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे प्रकरण येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाच्या अध्यक्षाकडे येईल. यायलाही पाहिजे, असं मला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले.
