
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. हा निकाल उद्याच लागणार असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान याबाबतचे संकेत दिले आहेत.

घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाचे निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्याच निकाल लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं हे सत्तांतर संपूर्ण देशात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल आता कुणाच्या बाजूने लागणार याची राजकीय क्षेत्रासह सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
