खारघर मृत्युप्रकरणी ‘आप’ ने घेतली न्यायालयात धाव

मुंबई: १६ एप्रिल रोजी खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे झालेल्या १४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल न केल्याने ‘आम आदमी पार्टीच्या वतीने पनवेल न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह या दुर्घटनेचा सखोल चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती ‘आप’तर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या २६ मे रोजी होणार आहे. खारघर येथील दुर्घटनेनंतर १८ एप्रिल रोजी ‘आपच्या वतीने या सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार खारघर पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र या संदर्भात खारघर पोलिसांकडून काहीच कृती न झाल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी २४ एप्रिल रोजी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन त्यांनाही लेखी निवेदन देऊन आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र त्यानंतरही पोलिसांकडून काहीच कृती न झाल्याने अखेर आम आदमी पक्षाने पनवेल न्यायालयात धाव घेतली आहे.

🤙 8080365706