महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जागा वाटपावर चर्चा : नाना पटोले

सोलापूर :कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले. यावेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा व विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा रहात आहे, जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंधपणे काम करत आहेत. तरुणही मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात सहभागी होत असून जनतेच्या आशिर्वादाने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल.

🤙 8080365706