राजाराम कारखान्याचा निकाल आज; कंडका पडणार का..? शिट्टी वाजणार… संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे.

कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही. कंडका पाडायचाच म्हणून सतेज पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे कंडका पडणार? की महादेवराव महाडिकांची शिट्टी पुन्हा एकदा घुमणार याची उत्सुकता आहे. बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात मतमोजणी होणार असून, सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा मतमोजणी हातकणंगले तालुक्यातील गावांपासून होणार आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल बंदी आहे. त्यामुळे ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या संस्था गटाची मतमोजणी दुपारनंतर सुरु होणार आहे. याच गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दीडशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

🤙 8080365706