
असित बनगे
कोल्हापूर : गेले महिनाभर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वादळ झंजावत आहे. जिल्ह्यातील पारंपारिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाटील व महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्याच्या राजकारणात असे पहिल्यांदाच होत असावे की केवळ एका साखर कारखान्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मात्तबर गटांनी ही निवडणूक वैयक्तिकरित्या प्रतिष्ठेची बनवली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सभांचा लावलेला सपाटा व सभासदांचा मिळणारा प्रतिसाद यावरून सत्ताधारी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते.पाटील व महाडिक यांच्यात असणारे राजकीय वैर हे काही जिल्ह्याला नवीन नाही. पण राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने या राजकीय वैराने, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय सीमा ओलांडली आहे. राजकारणात पक्ष वेगळे ,विचारसरणी वेगळी असली की मतभेद हे निश्चितच असतात पण या मतभेदांची जागा वैयक्तिक टीका टिप्पणीने घेणे कधीही घातकच.सतेज पाटील व महाडिक या दोन्ही गटांनी या निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त करून दिले. दहा-बारा दिवस दोन्ही गटांकडून या कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सुमारे 122 गावात प्रचार सभा गाजवण्यात आल्या. एकूणच सर्व प्रचारसभांचे मूल्यमापन केले असता, कार्यक्षेत्रातील सभासदांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सभासदांचा विश्वास प्राप्त करण्यात सत्ताधारी यशस्वी झाल्याचे पहावयास मिळते.माजी गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचारसभेदरम्यान आणि त्या आधीही सत्ताधारी महाडिक पॅनलला जे जे प्रश्न विचारले त्या त्या प्रश्नांची पुराव्यासहित उत्तरे देण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले आहेत.
विरोधी पाटील गटाकडून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे खंडन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले.वडणगे येथे शुभारंभ प्रचार सभेत पॅनलचे प्रमुख अमल महाडिक यांनी तर कारखान्याचा गेल्या 28 वर्षांचा लेखाजोखाच सभासदांपुढे मांडला.ज्या ज्या वेळी विरोधी गटाचे बंटी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांचे रान उठवले त्या त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या प्रतिउत्तरामुळे सभासदांचाही सत्ताधाऱ्यां विषयीचा विश्वास अधिक पक्का झाल्याचे दिसून येते. एकूणच सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना कारखान्या विषयी दिलेले प्रत्युत्तर, वेळोवेळी सभासदांपुढे कारखान्याच्या कारभाराविषयी मांडलेला लेखाजोखा व सभासदांना विश्वासात घेऊन केलेले काम यामुळे सत्ताधाऱ्यांचेच या निवडणुकीत पारडे जड असल्याचे दिसून येते. बाकी कळेलच निवडणूक निकालानंतर.
