
कोल्हापूर : वारणा व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील अत्यावश्यक सोयी, सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
जि. प. मधील स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहामध्ये चांदोली व वारणा अभयारण्य पुनर्वसन वसाहतीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सीईओ संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरूण जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अशोक धोंगे उपवनसंरक्षक जि. गुरुप्रसाद, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व संबंधित वसाहतीमधील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी वसाहतीमधील नागरिकांचे विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा केली. ज्या वसाहती महसुली गावे म्हणून जाहीर झालेली आहेत अशा पात्र वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा अशी यावेळी मागणी करण्यात आली.
वसातील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशा सूचना पाटणकर यांनी केल्या. या बैठकीत उपस्थित झाल्यानंतर मुद्द्यांवर सीईओ संजय चव्हाण म्हणाले सर्व प्रश्न बाबत जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक पद्धतीने घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरण आदेश व ताबा पावती प्रमाणे ग्रामपंचायत दप्तरामध्ये आवश्यक त्या नोंदी घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल. वसाहतीतील नागरी सुविधांबाबत जिल्हा परिषद 100 टक्के सकारात्मक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
