
मुंबई : आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावं, अशा शब्दात अजित पवार यांनी काल संजय राऊत यांना थेट खडसावलं. यावरून संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलंय.
मी सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचं लिहिलेलं नाहीये. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? मी सत्य लिहिलंय आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावं, असं घडत नाहीये का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महाविकास आघाडीत आम्ही अजित पवारांवर प्रेम करतो. पण हा पक्ष फुटत असताना आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचं नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांवर दबाव असल्याचं स्पष्टच सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्यांची नावंही घेतली. पवार कुटुंबियांवर दबाव असल्याचं संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं. पण राष्ट्रावादी काँग्रेसमधील हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांवरही दबाव असल्याचं राऊत यांनी आज नाव घेऊन सांगितलं. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून भाजप ऑपरेशन करतंय. यावर आम्ही बोललो तर भाजपला राग यायला हवा. इतर कुणाला राग यायचं कारण नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
