क्षारपड जमीन सुधारण्यासाठी “शाहू” शेतकऱ्यांना पाठबळ देणार; राजे समरजितसिंह घाटगे

करनूर ता.कागल येथील शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामूहिकपणे राबवलेल्या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा चरीच्या उपक्रमाच्या पाहणीवेळीशाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,वीरकुमार पाटील व शेतकरी

कागल : ऊस उत्पादनात वाढीच्या दृष्टीने क्षारपड जमीनीचा पोत सुधारण्यासाठी दत्त -शिरोळ पॅटर्न प्रमाणे येथील शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पाठबळ देईल.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

करनूर ता.कागल येथील शेतकऱ्यांनी क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामूहिकपणे राबवलेल्या भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा चरीच्या उपक्रमाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. येथील सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन क्षारपड झालेली 15 एकर जमीन सुधारण्यासाठी अंदाजे पंधरा लाख रुपये खर्चाचा शाहू साखर कारखान्याच्या प्रोत्साहनातून हा उपक्रम राबविला आहे. घाटगे पुढे म्हणाले, सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून स्व. आप्पासाहेब उर्फ सा.रे .पाटील व स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी दत्त शिरोळ व शाहू साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध ऊस विकास योजना यशस्वीपणे राबवल्या. शिरोळ परिसरात क्षारपड जमिनी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. त्या सुधारण्यासाठी या कारखान्याने धडक मोहीम राबवून जमीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी केला आहे.या मुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असा उपक्रम राबवणा-या शेतकऱ्यांच्या पाठीशी कारखाना ठामपणे राहील. त्यासाठी प्रसंगी शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा अनुदान देण्याचा विचार करू.यावेळी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास कै.विलासराव देशमुख उद्योजकता विकास पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते घाटगे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला.यावेळी प्रकल्प अभियंता के डी मरजे, माजी उपनगराध्यक्ष मनोहर पाटील, शेती अधिकारी रमेश गंगाई,ऊस विकास अधिकारी के बी पाटील, दिलीप घोरपडे,नारायण गुरव,यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.स्वागत सचिन घोरपडे यांनी केले. आभार राजेंद्र घोरपडे यांनी मानले.

🤙 8080365706