
वानवडी: संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असून त्यामुळे परराज्यातून आणि विदेशातून आपल्याकडे गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचा अभिमानास्पद उल्लेख उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यातील पोलीस दलासाठी अत्याधुनिक स्वरूपाचे क्रीडासंकुल व वसतिगृहाचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
वानवडी येथील राज्य राखीव दलाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
