
कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडीत्रे या कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्या शुक्रवार दि.६ पासून सुरु होणार होत आहे.

करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून शुक्रवार दि.६ ते गुरुवार दि. १२ जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत राहणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवार दि.१३ रोजी होणार आहे.वैध उमेदवार यादी १६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार दि. १६ ते सोमवार दि. ३० जानेवारी अखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे.
निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर १ फेब्रुवारी पासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.या निवडणुकीसाठी रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.करवीरचे माजी आमदार व कुंभी कारखान्याचे विद्यमान चेअरमन चंद्रित नरके यांनी विरोधकांना फोडण्याची व्यूहरचना आखली असून कारखान्याच्या विजयावरच आमदार नरके यांची भावी वाटचाल दिसून येणार आहे त्यामुळे नरके यांची ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणार आहे.
