
मुंबई : खासदार संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत लढणार आहोत, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपाच्या वतीने आता मिशन लोकसभा राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पत्रकारांनी त्यांना शिंदे गटाची भूमिका काय असेल असा असा प्रश्न विचारला होता. त्याला त्यांनी हे उत्तर दिले आहे. युतीच्या आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे, ते जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य राहिल, मग तो निर्णय शून्य जागा लढविण्यासाठीचा असला तरी तो आपल्याला मान्य असेल, मात्र ते शिंदे साहेबांनी आम्हाला सांगायला हवे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
