कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवा ;नशामुक्त भारत अभियान कार्यशाळेत आवाहन

कोल्हापूर :  विविध कारणांमुळे व्यसनाधीनता वाढत असून त्यामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत.  तरी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही संपूर्ण योगदान देवून  कुटुंबे  उध्वस्त  होण्यापासून  वाचवा असे आवाहन मान्यवरांनी केले. 

 

केंद्र शासनाच्या नशामुक्त अभियानाअंतर्गत  येथील ‘सायबर’ महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी गुरूवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात  आला.यानंतर शिवानंद कोळी यांनी व्यसनमुक्तीचा पोवाडा सादर केला.      

जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, राज्यात दहा जिल्ह्यात  हे  अभियान सुरू असून यापाठीमागील हेतू आपण विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात पोहोचवावा. अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य समीर देशपांडे म्हणाले, वेगळ्या प्रकारचा आनंद शोधण्यासाठी विविध व्यसने करण्याकडे अनेकांचा कल असताना हे एक वेगळे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागेल. भारतात प्रत्येक वर्षाला २४ हजार कोटी रूपयांचा तंबाखू विकला जातो आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांवरती  शासनाचे २७ हजार कोटी रूपये खर्च होतात.  या व्यसनांचा मोठा फटका गरीबांना बसत असून अशा घरातील महिला आणि मुले यांना मोठी झळ बसते. म्हणूनच अशी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी सर्वांनी  योगदान देण्याची  गरज आहे. समाजकार्य विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले म्हणाले, आयुष्य जगण्याच्या  अनेक वाटा आहेत. कोणत्या वाटेने  जायचे हा ज्याचा त्याचा विषय असला तरी ज्या वाटेने  गेल्याने आयुष्याची वाट लागणार नाही असा रस्ता निवडण्यासाठी गरजूंना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची गरज आहे.यानंतर या अभियानाच्या राज्यसमन्वयक अनुष्का गुप्ता, अन्नू मौर्य यांनी विविध माहितीपट,स्लाईड शो याच्या माध्यमातून विविध व्यवसनांचे प्रकार, परिणाम आणि नियंत्रणासाठीच्या उपाययोजना याबाबतचे विशेष मार्गदर्शन केले.यावेळी  कार्यशाळेत  सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य प्रा. सुरेश आपटे  यांनी आभार मानले. सदानंद बगाडे यांनी सूत्रसंचालन  केले. यावेळी अधीक्षक सूर्यकांत म्हात्रे यांच्यासह समाजकारण विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.

🤙 8080365706