
कोल्हापूर : मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली.

रोहित पवार यांनी आज अचानक बेळगाव दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजपवर तोफ डागली. रोहित पवार म्हणाले की, बेळगावात गेल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचीच्या नेत्यांशी, नागरिकांशी चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न सुरु होता, पण शरद पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर वातावरण बदलून गेले. पवार साहेबांचा संवाद अनेक वर्षांपासून सीमाभागात आहे. कार्यकर्त्यांना डांबण्याचा प्रयत्न होत होता, पण पवारांनी अल्टीमेटम दिल्यानंतर परिस्थिती निवळली आहे. रोहित पवार यांनी सांगितले की, अनेक लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली.. बोलताना जय महाराष्ट्र म्हणाले, ही अस्मितेची लढाई असून आम्ही ती लढत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बंगळूरमध्ये शिवरायांचा अवमान झाल्यानंतर आम्ही निदर्शने करण्यास परवानगी मागितली तेव्हा 45 दिवस बेळगावमधील कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आले. हे अस्मितेच्या विरोधात असल्याने लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
