
कागल: आमचे आधारस्तंभ, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कागल येथील आपल्या सर्व्हे नंबर 248/1मध्ये घरे बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली. त्या जागेवरती आम्ही घरेही बांधली. मात्र या घरांच्या नियमितीकरणाचा प्रश्न गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रश्नामध्ये लक्ष घालून रखडलेला नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा असे साकडे विक्रमनगर गोसावी समाजाच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना निवेदनाद्वारे घातले.

निवेदनात पुढे म्हंटले आहे , स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी 1982 साली येथील जागा आम्हाला देऊन आमच्या निवाऱ्याची सोय केली. आम्ही तेथे वसाहत स्थापन करून त्या वसाहतीस ” विक्रमनगर “असे नावही दिले. मात्र गेली तीस वर्षे विद्यमान आमदार मुश्रीफ साहेब यांना नियमितीकरणाबाबत वेळोवेळी निवेदन देऊन विनंती करून सुद्धा त्यांच्याकडून नियमितीकरणाचे केवळ आश्वासनच मिळाले. राजेसाहेब, आपण शाहू महाराजांचा आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालवत आहात.
आमचा समाज आपणाकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे . तेव्हा आमच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नात आपण लक्ष घालून आमच्या घरांच्या नियमीतीकरणाचा प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावावा व आम्हाला आमची घरे नावावर करून द्यावीत असे साकडे घातले.
यावेळी गजानन माने, विक्रम गोसावी ,स्वप्निल शिंगाडे, सागर पवार, बाळ बकवाने व गोसावी कुटुंबीय उपस्थित होते.
