आमचाही संयम सुटू शकतो; शरद पवार यांचा कर्नाटकला इशारा

मुंबई: सीमाभागात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमधून जर काही अघटित घडल्यास त्याला बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. आमचाही संयम सुटू शकतो. याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईत दिला.

मागील काही दिवसांपासून हे प्रकरण वेगळय़ा स्वरूपात नेण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सुरू आहे. त्यामुळे सीमाभागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. माझा सीमा प्रश्नांशी अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. मला सत्याग्रह करावा लागला होता. प्रसंगी लाठय़ा खाव्या लागल्या आहेत. ज्यावेळी असे काही सीमाभागात घडते त्यावेळी सीमाभागातील घटक माझ्याशी संपर्क साधतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास मज्जाव केला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन आपणास धीर द्यावा, असा संदेश केला आहे. त्यामुळे गरज पडली तर मी बेळगावला जाणार, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.

🤙 8080365706