
पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करणारे होते; पण गेल्या पाच महिन्यांत आलेले शिंदे-फडणवीस सरकार काम करणारे आहे, असे मत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.पक्षाच्या जाहीर मेळाव्यात ते बाेलत हाेते.
विधानसभा प्रतोद भरत गोगावले, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहर प्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, किरण साळी, लीना पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांना पक्षप्रवेश देण्यात आला.डाॅ.शिंदे म्हणाले की, नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, म्हणून उठाव झाला. सामान्य शिवसैनिकांची भेट होणे सोडाच, ते मंत्री, आमदार, खासदार यांना भेटायचे नाहीत. अडीच वर्षे मुख्यमंत्री असून, शिवसैनिक काय यातना भोगत होते, हे पाहायला त्यांना वेळ नव्हता. म्हणून सत्तेला लाथ मारून ५० आमदार आणि १३ खासदार बाहेर पडले. सर्वसामान्य घरातील मुख्यमंत्री झाला आणि वर्षाबंगल्याची दारे सर्वसामान्यांसाठी खुली झाली.
